बुलढाणा : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक भाविकांचे मंगळवारी उपवास होते. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील खापरखेड सोमठाणा येथील विठ्ठल –रूख्मिणीच्या मंदिरातील उपवासाचे फराळ खाल्ल्याने गावातील तब्बल ५०० महिला आणि पुरूषांना विषबाधा झाली. त्यापैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. या ग्रामस्थांना पोलीस आणि इतर ग्रामस्थांना बिबी येथील ग्रामीण रूग्णालयात नेले आहे.
तर काही रुग्णांना मेहेकर, सुलतानपूर, लोणार, अंजनी खुर्द या ठिकाणच्या प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. या घटनेने परिसरात प्रचंड घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. ठिकठिकाणी वैद्यकीय अधिकारी हे गैरहजर दिसून आले आहेत. त्यामुळे पोलीस आणि महसूल प्रशासनाने परिसरातील खासगी डॉक्टरांना वैद्यकीय उपचारासाठी पाचारण केले. रात्री उशिरा हा धक्कादायक प्रकार घडलाय. परिसरात सद्या प्रचंड घबराट पसरली असून आरोग्य प्रशासनाविषयी संतापाची लाट निर्माण झालीय.
खापरखेड सोमठाणा तालुका लोणार येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरावर आज उपवासाच्या फराळाचे प्रसाद वाटप करण्यात आले होते. हा प्रसाद खाल्ल्यानंतर काही वेळातच लोकांना प्रचंड वेदना आणि त्रास होण्यास सुरूवात झाली. अनेकांना उलट्या, पोटदुखी व्हायला सुरुवात झाली. त्यामुळे गावात प्रचंड घबराट पसरली. पोलीस आणि महसूल प्रशासनाला या घटनेची माहिती होताच घटनास्थळी धाव घेत ग्रामस्थांना विषबाधा झालेल्या ग्रामस्थ महिला आणि पुरूषांना मिळेल त्या वाहनाने बिबी, लोणार, सुलतानपूर, मेहेकर अंजनी खुर्द येथील ग्रामीण रूग्णालयात आणले.
परंतु, या रूग्णालयात वैद्यकीय अधिकारी हे गैरहजर होते. त्यामुळे बिबी येथील खासगी डॉक्टरांसह परिसरातील डॉक्टरांना विनंती करून त्यांना या ग्रामीण रूग्णालयात बोलावण्यात आले तातडीने वैद्यकीय उपचार सुरू करण्यात आले होते. अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जात आहे. धक्कादायक बाब अशी, की या ग्रामीण रूग्णालयात बेड उपलब्ध नसल्याने रूग्णांना जमिनीवर झोपून त्यांना उपचार देण्यात आले. पोलीस आणि महसूल प्रशासनाचे अधिकारी जीवितहानी होऊ नये, यासाठी एकीकडे प्रयत्न करत असताना, आरोग्य विभागाचा गलथान कारभार चव्हात्यावर आला आहे.