अमळनेर : प्रतिनिधी
अभ्यासानिमित्त फोनवर बोलण्याऱ्या तरुणीच्या बोलण्याचा गैरफायदा घेत तरुणीचे कुटुंब व होणाऱ्या पतीला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या एका तरुणावर अमळनेर पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रताप महाविद्यालयात एम. ए.च्या प्रथम वर्षाला शिक्षण घेणाऱ्या पिडीत तरुणी असून तिच्यासोबत हर्षल हिम्मतराव पाटील हाही त्याच वर्गात शिक्षण घेत होता. दोघांचे अभ्यासासंदर्भात एकमेकांशी बोलणे होत होते. मात्र त्याचा वेगळा अर्थ काढून हर्षल पाटील हा पिडीत तरुणीकडे वाईट नजरेने बघू लागला. डिसेंबर महिन्यात परीक्षा संपल्यानंतर पिडितेचे लग्न जमले. दरम्यान प्रताप महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या आपल्या लहान बहिणीस हर्षलने तुझी मोठी बहिण जर माझ्याशी बोलली नाही, तर मी तुझ्या घरातील सर्वांना मारून टाकेन व धमकी दिली. दरम्यान, तरूणीचा साखरपुडा झाल्याने हर्षल हा अंगणात फेऱ्या मारत होता. ११ फेब्रुवारी रोजी लग्नाच्या बस्तानिमित्त दुकानात असताना त्याने बाहेर उभ्या असलेल्या लहान बहिणीला धमकी दिली. पिडीत तरुणीने अमळनेर पोलिसात फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा दाखल झाला असून तपास पोलिस करीत आहेत.