जळगाव : प्रतिनिधी
रस्त्याने घरी जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन जणांनी रुचीलक्ष्मी काबरा (४५, रा. अभियंता कॉलनी) यांच्या गळ्यातील सोन्याची चेन व मणी, मंगळसूत्र असलेली पोत चोरून नेली. ही घटना सोमवार, २९ जानेवारी रोजी रात्री हनुमान कॉलनीत घडली. या प्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात दोन अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील अभियंता कॉलनीमधील रहिवासी असलेल्या रुचीलक्ष्मी काबरा या सोमवारी रात्री सव्वाआठ वाजेच्या सुमारास घराकडे जात होत्या, त्यावेळी दुचाकीवरून दोनजण आले व या महिलेच्या गळ्यातील २६ हजार रुपये किमतीची साडेचार ग्रॅम वजनाची सोन्याची चेन, ४७ हजार रुपये किमतीची आठ ग्रॅम वजनाची मणी, मंगळसूत्र असलेली पोत असा एकूण ७४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ओढून नेला. महिलेने परिसरात चोरट्यांचा शोध घेतला, मात्र ते न सापडल्याने त्यांनी रामानंद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून दोन अनोळखीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि रोहिदास गभाले करत आहेत.