जळगाव : प्रतिनिधी
शहरातील एका दुकानामध्ये आल्यानंतर तेथून साडी घेतली नाही म्हणून दुकानदार अमित दिलीपकुमार प्रथ्यानी (४५, रा. मोहाडी रोड) यांनी महिलेसह तिच्या आई व भावाला शिवीगाळ, धक्काबुक्की करत मारहाण केली. ही घटना सोमवार, दि. २९ जानेवारी रोजी संध्याकाळी फुले मार्केटमधील दुकानात घडली. याप्रकरणी दुकानदाराविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
वाघनगर परिसरातील रहिवासी असलेल्या संगीता बिस्मिल्ला तडवी (३०) या त्यांच्या आई व भावासह फुले मार्केटमधील अमर क्लॉथ सेंटर या साडीच्या दुकानात खरेदीसाठी गेल्या होत्या. तेथून त्यांनी साडी खरेदी केली नाही यावरून दुकानदार अमित प्रथ्यानी यांनी या तिघांना शिवीगाळ, धक्काबुक्की करत मारहाण केली. तसेच ‘तुमको क्या करने का है कर लो, मेरे नाम की कम्प्लेंट करो या कुछ भी करो’ अशी धमकी दिली. याप्रकरणी संगीता तडवी यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून दुकानदाराविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहायक फौजदार संजय बडगुजर करत आहेत