चोपडा : प्रतिनिधी
राज्यात बंदी असणारा गुटखा मध्यप्रदेशातून चोपड्यामार्गे जळगावकडे जात असताना नाशिक येथील विशेष पोलिस महानिरीक्षक पथकाने केलेल्या कारवाईत ६२ लाख ६१ हजार १०४ रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. सोमवारी सकाळी एका शाळेजवळ ही कारवाई करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, विशेष पोलिस महानिरीक्षक यांच्या पथकाला गुप्त माहिती मिळाल्याने त्यांनी सोमवारी सकाळी सापळा लावला. मध्य प्रदेशातून उमर्टी, चोपडामार्गे जळगावकडे जाणाऱ्या ट्रकची (एमएच१९/सीवाय६९७२) चोपडा-शिरपूर रस्त्यावर शहराबाहेरील चावरा शाळेजवळ तपासणी केली. त्यात गुटखा असलेली एकूण ७५ पोती सापडली. त्याची किंमत ६२ लाख ६१ हजार १०४ रुपये असून, मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कारवाई करणाऱ्या पथकाने जळगाव अन्न भेसळ विभागाला कळवून अन्नसुरक्षा अधिकारी शरद पवार यांना पाचारण करण्यात आले.
पोहेकॉ रवींद्र स्वरूपसिंग पाडवी यांनी चोपडा शहर पोलिस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून कल्पेश अशोक साळुंखे (२६, शिंदी, भडगाव), ललित माधव जाधव (२६, दादावाडी, जळगाव), अमोल युवराज पाटील (२१ तुराखेडा, पारोळा) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना अटक करण्यात आली आहे. हा गुटखा जळगाव येथील अरुण पाटील यांच्याकडे नेला जात होता.