रावेर : प्रतिनिधी
तालुक्यातील बोहर्डे येथील पूर्वाश्रमीच्या प्रियकराविरुद्ध एकदा विनयभंगाचा गुन्हा दाखल करूनही त्याच्याकडून होत असलेल्या बदनामीला कंटाळून विवाहितेने चक्क धारदार विळ्याने तिच्या पूर्वाश्रमीच्या प्रियकरावर वार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना दि. २८ जानेवारी रोजी घडली. याप्रकरणी रावेर पोलिसात या विवाहितेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी विवाहितेला न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बोहर्डे येथील जितेंद्र एकनाथ पाटील या ३० वर्षीय युवकाचे एका २८ वर्षीय विवाहितेशी प्रेमसंबंध जमले. दरम्यान, त्यांचे रंगलेले प्रेमप्रकरण पतीच्या निदर्शनास आल्यानंतर व सासरी सर्व हकिगत समजल्यानंतर विवाहितेच्या माध्यमातून त्या प्रियकराविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. समाजात बदनामी होत असल्याचे विवाहितेने त्यास प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिला होता. मात्र, जितेंद्र पाटील याचा अट्टहास सातत्याने सुरू होता. रागाच्या भरात तिने जितेंद्रवर वार करून त्यास जखमी केले. यावेळी जितेंद्रच्या वहिणीने आवरण्याचा प्रयत्न केला असता तिच्याही हातावर विळा मारून तिलाही गंभीर जखमी केल्याची घटना घडली. ही घटना दि २८ जानेवारी रोजी दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास बोहर्डे गावालगतच्या जि. प. मराठी शाळेच्या मैदानावर घडली. तपास फौजदार घनश्याम तांबे हे करीत आहे.