मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला असून आंदोलक मनोज जरांगे पाटील दि.२० रोजी मुंबईच्या दिशेने रवाना झालेत. २५ जानेवारी रोजी मराठा आंदोलक नवी मुंबईत दाखल होणार आहेत. मराठा आरक्षणासाठी मुंबईकडे निघालेल्या आंदोलक मराठा बांधवांचे २५ जानेवारी रोजी दुपारचे जेवण पनवेल येथे होईल. पनवेलमध्ये तब्बल १० लाख मराठा बांधवांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
या जेवणाची जबाबदारी रायगड जिल्हा सकल मराठा समाजाने उचलली आहे. त्यासाठी रायगड जिल्ह्यात तालुकावार बैठका घेतल्या जात आहेत. १० लाख मराठा आंदोलक येतील, अशा अंदाजाने भाकरी, भाजी आणि पुलाव याची व्यवस्था केली जाणार आहे. घराघरांतून भाकऱ्या तयार केल्या जाणार आहेत. स्वयंसेवकांमार्फत जेवण वितरीत केलं जाणार आहे.
लोणावळ्यातील जुन्या पुणे मुंबई महामार्गालगत असलेल्या वाकसई गावातील दोनशे एकर मैदानावर आजपासून तयारी सुरू करण्यात येत आहे. तब्बल वीस जेसीबीच्या सहाय्याने मैदान सपाटीकरणाचं काम सुरू केलं आहे. तर सर्व मराठा बांधवांच्या जेवणाची सोय ही मावळ आणि आजूबाजूच्या परिसरात असणारे प्रत्येक मराठा कुटुंब करणार आहे.
पहिल्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली ते मातोरी प्रवास केला. त्यानंतर आज दुसऱ्या दिवशी २१ जानेवारीला मातोरी ते करंजी बाराबाभळी प्रवास करणारेत. मातोरीतून सकाळी ८ वाजता पुढील प्रवासाला सुरूवात होईल. त्यानंतर तनपुरवाई (ता. पाथर्डी) येथे दुपारचे जेवण तसेच बाराबाभळी-कारंजी बाट (ता, नगर) येथे रात्रीचा मुक्काम / जेवण व जेवण असेल.