जळगाव : प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यात गेल्या काही महिन्यापासून आत्महत्या होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घडत असतांना नुकतेच जळगाव शहरातील एका परिसरात ३३ वर्षीय तरुणाने चक्क कामासाठी गेलेल्या आईला मोबाइलवरून मी आत्महत्या करत आहे, असे सांगत गळफास घेवून आत्महत्या केली आहे. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील खोटे नगर परिसरात निकेतन समाधान पाटील (वय ३३) या तरुणाने गुरुवार, १८ रोजी अपार्टमेंटमध्ये सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. गुरुवारी निकेतन पाटीलची आई गावात कामाला गेलेल्या होत्या. त्यामुळे निकेतन हा घरी एकटाच होता. त्याने आईला मोबाइल करून आत्महत्या करत असल्याचे सांगून मोबाइल कट केला. त्यानंतर त्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या तरुणाच्या घराजवळ त्याची आत्या राहते.
हा प्रकार समजताच आत्याने घरी धाव घेतली. तोपर्यंत निकेतनची प्राणज्योत मालवलेली होती. निकेतनची आई घरी आल्यानंतर त्यांनी आक्रोश केला. तालुका पोलिसांनी मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेला. या प्रकरणी जळगाव तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयताच्या पश्चात आई आणि लहान भाऊ रितेश असा परिवार आहे. पुढील तपास पोहेकॉ संजय भालेराव करीत आहेत.