वर्धा : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक शहरात गुन्हेगारी घटना घडत असतांना नुकतेच वर्धा शहरात मामा-भाच्यामध्ये कोणत्या ना कोणत्या घरगुती मुद्द्यांवरुन वाद होत होते. एक दिवस हा वाद विकोपाला गेला. भाच्याने चक्क मामाच्या डोक्यावर विटेने प्रहार करीत जबर मारहाण केलीय. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या मामाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी हिंगणघाट पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी आरोपी भाच्याला अटक केली आहे. तो सध्या पोलीस कोठडीत आहे. प्रकाश देवराव मसराम असे मृतकाचे नाव आहे. तर पोलिसांनी याप्रकरणात संशयित आरोपी खुशाल राजू तुमडाम (२५) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
आरोपी खुशाल आणि मृतक प्रकाश हे दोघेही मामा-भाचे आहेत. हिंगणघाटच्या इंदिरानगर येथील एकाच घरात राहत होते. दोघांमध्ये नेहमी घरगुती वाद होत होते. याच घरगुती वादातून ९ जानेवारी रोजी आरोपी खुशालने मामा प्रकाशच्या डोक्यावर विटेने गंभीर प्रहार करुन त्यास रक्तबंबाळ केले. मात्र, उपचारादरम्यान मामा प्रकाशचा मृत्यू झाला. याप्रकरणी प्रकाशची पत्नी कांता हिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी खुशालविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी खुशालने प्रकाश मसराम याच्या डोक्यावर विटेने मारहाण केली. मामा प्रकाशला रक्तबंबाळ अवस्थेत पाहून खुशालला घाबरगुंडी सुटल्याने स्वत:ला वाचविण्यासाठी त्याने स्वत:च प्रकाशला उपजिल्हा रुग्णालयात नेले आणि प्रकाश हा दुचाकीवरुन पडल्याने जखमी झाल्याचे सांगितले. प्रकाश यांना प्राथमिक उपचारानंतर तत्काळ सेवाग्राम येथील रुग्णालयात नेले मात्र, प्रकृती नाजूक असल्याने त्याला नागपूर येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान मृत्यू झाला.