बोदवड : प्रतिनिधी
तालुक्यातील हिंगणे येथील एका ३० वर्षीय तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली. त्यांचा सात महिन्यापूर्वीच विवाह झाला होता. संसाराची नवीनच सुरुवात झाली असताना काळाने असा क्रूर घाला घातला.
मिळालेल्या माहितीनुसार, हिंगणे येथील अक्षय उर्फ निवृत्ती गजानन पाटील (वय ३०) हा मार्केटिंगचा व्यवसाय करणारा तरुण दि. ११ रोजी नेहमीप्रमाणे कामावरून घरी परतला असता त्याला अचानक हृदयाचा त्रास झाला. लगेचच उलटी होऊन तो खाली कोसळला. नातलगांनी रुग्णालयात आणले असता त्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. या तरुणाचे सात महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.