नागपूर : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक ग्रामीण भागातून अवैध वाहतूक सुरु असतांना नुकतेच नागपूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत चंद्रपूर नागपूर मार्गावर गांजाने भरलेला कंटेनर जप्त केला आहे. तब्बाल ५० लाखांच्या गांजा पोलिसांनी या कारवाईत जप्त केला आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, आज पहाटे चंद्रपूर नागपूर मार्गावरून ट्रक निघाला होता. यावेळी पोलिसांना ट्रकमध्ये गांजा लपवून नेत असल्याची माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी सापळा रचून ५० लाखांच्या गांजासह ६९ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. चालकाच्या कॅबिनमध्ये वेगळा कप्पा तयार करून हा गांजा लपवून नेला जात होता. आज पहाटेच पोलिसांनी हा ट्रक थांबवत तपासणी केली. त्यावेळी ट्रकमध्ये छुप्या पद्धतीने तयार केलेल्या कप्प्यामध्ये सुमारे 495 किलो गांजा लपवून ठेवल्याचं उघडकीस आलं. याप्रकरणी पोलिसांनी शब्बीर खान आणि मुनव्वर खान अशा दोन आरोपींना अटक केली आहे.
मुंबईमध्ये देखील आज सकाळी अमली पदार्थांप्रकरणी पोलिसांनी एका नायजेरियन तरुणाला अटक केली. मुंबईच्या सांताक्रुज पूर्वेकडील वाकोला पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली आहे. कोकेन या अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी हा नायजेरियन तरुण आला होता. वाकोला पोलिसांनी ही कारवाई केली आहे. अँथोनी मादुका न्वायझे (32 वर्षे) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपीकडून 55 ग्रॅम कोकेन जप्त केले आहे. या कोकोनची बाजारभावातील अंदाजे किंमत 55 लाख रुपये इतकी आहे.