सांगली : वृत्तसंस्था
राज्यातील अल्पवयीन मुलीसह विवाहितेवर विनयभंग व अत्याचाराच्या अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत असतांना नुकतेच आता सांगलीच्या आटपाडी तालुक्यात देखील अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. अल्पवयीन मुलींना बाहेर फिरायला बोलावून तीन नराधमांनी त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केला आहे. सदर घटनेमुळे संपूर्ण आटपाडी तालुक्यात खळबळ पसरली आहे. आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, अल्पवयीन तिन्ही मुली एकाच गावात राहणाऱ्या होत्या. काही दिवसांपासून ३ मुलं या तिघींचा पाठलाग करत होते. पाठलाग करताना त्यांनी मुलींशी संवाद साधला. गोड गोड बोलून त्यांना आपल्या जाळ्यात खेचलं. त्यानंतर त्यांना बाहेर फिरायला बोलावलं. आपल्याला गावाबाहेर फिरायला मिळणार या विचाराने मुली देखील तयार झाल्या.
तिन्ही मुली २७ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता आटपाडीच्या कल्लेश्वर मंदिराजवळ पोहचल्या. पुढे तिन्ही तरुण त्यांना घेऊन कौठुळी गावाच्या दिशेने निघाले. आपल्यासोबत पुढे घात होणार आहे. आपल्यावर मोठं संकट येणार आहे याबाबत मुलींच्या मनात जराही शंका नव्हती. बाहेर फिरण्यासाठी त्या फार उत्सुक आणि आनंदी होत्या. प्रवासात अचानक तरुण मुंलींना वाटेतील एका लॉजवर घेऊन गेले. तेथे त्यांना जबरदस्ती करत तिघींवरही लैंगिक अत्याचार करण्यात आला. झालेला प्रकार मुलींनी आपल्या घरी कुटुंबीयांना सांगितला. हे सर्व ऐकून मुलीच्या घरच्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी मुलींना घेऊन पोलीस स्टेशन गाठलं आणि मुलांबाबत तक्रार दाखल केली. दाखल तक्रारीनुसार, आटपाडी पोलीस ठाण्यात संशयितांविरुद्ध ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या तिघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.