अमळनेर : प्रतिनिधी
शहरात चोरून लपून दुचाकीवरून गांजा आणणाऱ्या दहिवद येथील तरुणावर अमळनेर पोलिसांनी कारवाई करून त्याच्याजवळून ११ किलो गांजा जप्त केला. ही कारवाई सोमवारी दि. १ मध्यरात्री १:४० वाजता धुळे रोडवर करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर शहरात एक तरुण दुचाकीवर गांजा विक्रीसाठी आणत असल्याची माहिती अमळनेर पोलिस स्टेशनचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक शीतलकुमार नाईक यांना मिळाल्यावर त्यांनी डीवायएसपी सुनील नंदवाळकर यांना माहिती देऊन ताबडतोब हेकों किशोर पाटील, शरद पाटील, नीलेश मोरे, रवींद्र पाटील, दीपक माळी, गणेश पाटील, जितेंद्र निकुंभे, सुनील महाजन यांना घेऊन धुळे रस्त्यावर हॉटेलजवळ दबा धरून बसले. एक तरुण दुचाकीला दोन काळ्या रंगाच्या पिशव्या घेऊन दुकानाच्या मागे लपल्याची माहिती मिळताच त्याच्यावर छापा टाकण्यात आला.
त्याच्याजवळील पिशव्यांमध्ये १ लाख ६५ हजार रुपये किमतीचा गुंगी आणणारा ११ किलो ७५ ग्रॅम ओलसर गांजा आढळून आला. आरोपीला अटक करून त्याचे नाव विचारले असता, त्याने पिंट्या देवराम रावत (२४, उमरापाणी, ता. वारला, जि. बडवाणी, ह. मु, दहिवद, ता. अमळनेर) असल्याचे सांगितले. पोलिसांनी तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्यासमक्ष पंचनामा करून पिंट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे. याबाबत अधिक तपास पोलिस करत आहेत.