जळगाव : प्रतिनिधी
शहरातील पवन नगरातील ४५ वर्षीय धर्मा किसन गवळी हे माहेरी गेलेल्या पत्नीला घेण्यासाठी रेल्वेने निघालेले असतांना ते रेल्वेतून पडल्याने ठार झाल्याची घटना शनिवार, ३० डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास प्रजापतनगरनजीक असलेल्या रेल्वे रुळाजवळ घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, बांधकामाच्या ठिकाणी सेंटरिंगचे काम करणारे धर्मा गवळी यांच्या पत्नी खंडवा येथे माहेरी गेल्या होत्या. त्यांना घेण्यासाठी गवळी हे सकाळी रेल्वेने जायला निघाले.प्रजापतनगरनजीक रेल्वे रुळावर खांब क्रमांक ४२१/२बी ते ४२१/४बी दरम्यान ते रेल्वेतून खाली पडले. नागरिकांनी तालुका पोलिसांना माहिती दिली. गवळी यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. मयताच्या खिशात रेल्वेचे तिकीटही आढळून आल्याची माहिती नातेवाइकांनी दिली. दरम्यान, धर्मा गवळी यांच्या अपघाती निधनाने तीन मुले पोरकी झाली आहेत.