जळगाव : प्रतिनिधी
मेहरुण तलावामध्ये अंघोळीसाठी गेलेल्या शाहूनगर परिसरातील १३ वर्षीय चार मुले पाण्यात बुडून गटांगळ्या खाऊ लागली, त्यावेळी तीन जणांना वाचविण्यात यश आले; मात्र ईशान शेख वसीम (१३, रा. शाहूनगर) या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवार, २९ डिसेंबर रोजी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, शाहूनगर परिसरात राहणारे ईशान शेख, मोईन खान अमीन खान (१३), अयान तस्लीम भिस्ती (१३) व असलम शेख सलाउद्दीन (१३) हे चौघे जण शुक्रवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास मेहरुण तलाव परिसरात आंघोळीसाठी गेले. चौघेही पाण्यात उतरले व काही वेळातच ते गटांगळ्या खाऊ लागले. हा प्रकार आजूबाजूच्या नागरिकांच्या लक्षात आला. त्यावेळी ते मदतीसाठी धावले. यातील मोईन खान, अयान भिस्ती व असलम शेख हे तिघे जण लवकर हाती लागले. त्यांना बाहेर काढून त्यांच्या पोटातून पाणी काढण्यात आले. त्यानंतर ईशान सापडला. सामाजिक कार्यकर्ते अनिल सोनवणे यांचे ८० वर्षीय वडील मोतीराम तोताराम सोनवणे यांनी बुडणाऱ्या मुलांना बाहेर काढले. चौघांनाही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेले.
तेथे ईशान याला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर चारही मुलांचे नातेवाईक व परिसरातील नागरिक मेहरुण तलाव परिसर व रुग्णालयात पोहोचले. ईशानच्या मृत्यूची वार्ता कानी पडताच नातेवाइकांनी मोठा आक्रोश केला. पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्यासह त्यांचे सहकारी घटनास्थळी व रुग्णालयात पोहोचले.