बुलढाणा : वृत्तसंस्था
गेल्या काही महिन्यापासून नेहमीच बुलढाणा येथील समृद्धी महामार्ग असो कि राष्ट्रीय महामार्ग क्र.६ असो नेहमीच काही ना काही छोट्या मोठ्या अपघातामुळे हे दोन महामार्ग चर्चेत येत असतांना भाऊबिजेच्या दिवशी देखील अशीच एक भयानक अपघात मध्यरात्रीच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वर घडला आहे. यात जळगाव जिल्ह्यातील दोन तरुण तर कल्याण येथील एक तरुण ठार झाल्याचे समजते.
मिळालेल्या माहितीनुसार, वडनेर गावाजवळ दि.१५ नोव्हेबर बुधवारी रोजी रात्री १२ वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वर तीन तरुण दुचाकीवरून जात असतांना त्याचवेळी मलकापूर येथून नांदुराकडे प्रवाशांना घेऊन ट्रॅव्हल्स भरधाव वेगाने निघाली होती. ट्रॅव्हल्सने दुचाकीला जबर धडक दिल्याने दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे.
या अपघातात जळगाव जिल्ह्यातील स्वप्निल करणकार (वय २७) गोपाल शालिक राणे (वय ३४ वर्ष) तर कल्याण येथील आकाश राजू आखाडे अशी मयत तरुणांची नावे आहेत. स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. अपघाताची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृत तरुणांचे मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी मलकापूर येथील रुग्णालयात पाठवले आहेत. याप्रकरणी ट्रॅव्हल्स चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऐन भाऊबीजीच्या दिवशी ३ तरुणांचा मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.