जळगाव : प्रतिनिधी
दारुच्या नशेत असलेल्या मुलाच्या हातात आईला गावठी कट्टा दिसला. तो कट्टा हिसकवितांना गोळीबार होवून ती तरुणाच्या आईच्या हाताला लागली. यात कलाबाई प्रकाश सोनवणे (वय ६०) या गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास शिवाजीनगरात घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील शिवाजी नगर परिसरात कलाबाई प्रकाश सोनवणे या सेवानिवृत्त आरोग्य सेविका आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. शनिवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास कलाबाई या घरी असतांना त्यांचा मोठा मुलगा रोहीत हा दारुच्या नशेत त्यांना दिसला. त्याच्या हातात गावठी कट्टा असल्याने कलाबाई यांनी तो कट्टा त्याच्या हातातून हिसकविण्याचा प्रयत्न केला. यावेळी गावठी कट्ट्यातून गोळी फायर होवून ती कलाबाई सोनवणे यांच्या मनगटाजवळ लागली. त्यांच्या हातातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत असल्याने कुटुंबियांनी त्यांना तात्काळ खासगी हॉस्पिटलध्ये दाखल केले. खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर याठिकाणी शस्त्रक्रिया करुन कलाबाई सोनवणे यांच्या हातात अडकलेली गोळी बाहेर काढण्यात आली. याप्रकरणी त्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन त्यांचा मुलगा रोहीत प्रकाश सोनवणे याच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.