अमळनेर : प्रतिनिधी
लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीस घरातून पळवून नेणाऱ्या अविनाश सुरेश धनगर (२२ रा. भावेर ता. शिरपूर) यास १० वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अमळनेर येथील जिल्हा सत्र न्यायाधीश२पी. आर. चौधरी यांनी सोमवारी हा निकाल दिला.
मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीस अविनाश धनगर याने लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले होते. याबाबत तिच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोपडा पोलिसात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक अजित साबळे व पोहेकॉ प्रदीप राजपूत यांनी २२ डिसेंबर २०२१ रोजी आरोपी व पीडित मुलीला ओंकारेश्वर (मध्य प्रदेश) येथून ताब्यात घेतले.
आरोपीने या अल्पवयीन मुलीस रोहिणी मानपूर, सुंद्रेल व ओंकारेश्वर या ठिकाणी नेऊन तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्तापित केले. त्यावरून आरोपीविरुद्ध कोर्टात दोषारोप दाखल करण्यात आले होते. या खटल्यात न्यायालयाने १८ साक्षीदार तपासण्यात आले. न्या. चौधरी यांनी आरोपीस भादंवि कलम ३६३ ए प्रमाणे ५ वर्ष व लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा २०१२ कलम ४ नुसार १० वर्ष शिक्षा सुनावण्यात आली. या खटल्यात सरकारी वकील आर.बी. चौधरी यांनी युक्तिवाद केला तर पैरवी अधिकारी उदयसिंग साळुंखे यांनी काम पाहिले.