नवी दिल्ली : वृत्तसंस्था
दोन दिवसाआधी नेपाळमध्ये भूकंपामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. त्यानंतर आज दिल्ली-एनसीआरमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. 5.8 इतकी त्याची तीव्रता नोंदवण्यात आली. सोमवारी संध्याकाळी 4.16 वाजता हे धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू पुन्हा एकदा नेपाळ होता. यापूर्वी, 4 नोव्हेंबर रोजी रात्री 11:32 वाजता नेपाळमध्ये 6.4 तीव्रतेचा भूकंप झाला होता. यामध्ये 157 लोकांचा मृत्यू झाला होता.
त्या भूकंपाचा परिणाम भारतातही दिसून आला. दिल्ली-एनसीआर व्यतिरिक्त उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा, पंजाब आणि बिहारची राजधानी पाटणा येथे भूकंपाचे धक्के जाणवले. मात्र, भारतात कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही.