धुळे : प्रतिनिधी
जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील लाकड्या हनुमान येथील वनजमिनीवर लावण्यात आलेल्या १०८ किलो वजनाचा ओला गांजासह ४ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून एकाविरोधात सांगवी पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सांगवी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक जयेश खलाणे यांना मंगळवारी याबाबत खबर मिळाली होती. रायसिंग पावरा (रा. लाकड्या हनुमान) याने वनजमिनीवर गांजा सदृश अमली पदार्थाची लागवड केल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक खलाणेसह नायब तहसीलदार महेश बोरसे व पोलिस पथकासह घटनास्थळी छापा टाकण्यासाठी गेले, मात्र त्याची चाहूल संबंधित शेतमालक रायसिंग पावरा यास लागल्याने तो तेथून फरार झाला. सदर क्षेत्रामध्ये ५ ते ६ फुट उंचीचे गांजाची झाडे दिसून आली. त्यानंतर ती मुळासकट उपटण्यात आली. ४ लाख ३२ हजार रुपये किमतीचे १०८ किलो वजनाची गांजाची झाडे जप्त करण्यात आली.