धरणगाव : प्रतिनिधी
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाजवळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या स्वागताच्या वेळी गर्दी झाली. त्याचा फायदा घेत चोरांनी अनेक जणांचे मोबाइल आणि पैसे लंपास केले. यावेळी काही नागरिकांनी दोन संशयितांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी रात्री उशिरा धरणगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे शनिवारी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. धरणगावात पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनसाठी त्यांचे रात्री ९ वाजेच्या सुमारास आगमन झाले. स्वागताच्या वेळी झालेल्या गर्दीचा फायदा घेत तीन चोरांनी अनेक जणांच्या खिशातील मोबाइल आणि पाकीट मारायला सुरुवात केली. त्यात मुक्तगिर गुलाम मोहम्मद देशमुख यांचा १५ हजार रुपये किमतीचा मोबाइल आणि १५ हजार रोख, गंगाराम शंकर साळुंखे (पाळधी वाडा) यांच्या खिशातील १० हजार रुपये रोख, डी. जी. पाटील यांच्या खिशातील ५ हजार रुपये रोख आणि एटीएम कार्ड चोरीला गेले. तसेच, अन्य काही जणांचे मोबाइल चोरीला गेले आहेत.
या गर्दीमध्ये तीन तरुणांचे वागणे संशयास्पद वाटल्यामुळे आबा वाघ व अन्य नागरिकांनी दोन तरुणांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिस स्थानकात नेल्यावर त्यांनी त्यांची ओळख दिली. हे युवक १८ वर्षीय वयोगटातील असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्यासोबत असलेला तिसरा तरुण मात्र गर्दीचा फायदा घेत फरार होण्यात यशस्वी झाला. या दोघांविरुद्ध प्रमोद श्रीराम जगताप (बांभोरी) यांच्या फिर्यादीवरून रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस चौकशीत दोघा संशयितांकडून फक्त १२ ते १५०० रुपये रोख आढळून आले. मोबाइल व इतर रोकड मिळून आली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.