नाशिक : वृत्तसंस्था
ऑनलाइन काम शोधणे दोन महिलांना चांगलेच महागात पडले आहे. टास्क पूर्ण करण्याच्या नादात या गृहिणी असलेल्या महिलांना तब्बल साडेपाच लाख रुपये गमवावे लागले असून, याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात फसवणूक आणि आयटी अॅक्टनुसार वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
नाशिक – आडगाव शिवारात राहणारी महिला गेल्या सप्टेंबर महिन्यात इंटरनेटवर घरबसल्या कामाचा शोध घेत असताना तिच्याशी ९०२६३११९८७ या व्हॉट्सअॅप क्रमांकावरून व वेगवेगळ्या टेलिग्राम सोशल साइटवरून संपर्क साधण्यात आला होता. घरबसल्या पैसे कमविण्याचे आमिष दाखवून तिला वेगवेगळे टास्क देण्यात आले. यापोटी तिला अवघ्या चार ते पाच दिवसांत टेलिग्राम आयडी, तसेच आयसीआयसीआय, एचडीएफसी आणि अॅक्सिस बँक खात्यात ३ लाख १५ हजारांची रक्कम भरण्यास भाग पाडण्यात आले, तर दुसऱ्या महिलेस ७०९९१०४५०४, ८२५०६०८३९६ ९३६९०४९२४२ व ९२६३१७८४३९ या क्रमांकावरून संपर्क साधण्यात आला होता. इन्स्टाग्राम या सोशल साइटच्या प्लॅटफॉर्म जाहिरातीसाठी त्यांना ऑनलाइन पार्ट टाइम जॉब देण्याचे आमिष दाखविण्यात आले.
दि. ११ ते १९ सप्टेंबर दरम्यान त्यांना टास्कची ऑर्डर पूर्ण करण्याकरिता टेलिग्राम व यूपीआय आयडी, तसेच आयसीआयसीआय, एचडीएफसी व अॅक्सिस बँकेच्या वेगवेगळ्या खात्यांत २ लाख १५ हजार ११६ रुपये भरण्यास भाग पाडण्यात आले. महिना उलटूनही मोबदला न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच दोन्ही महिलांनी सायबर पोलिसांत धाव घेतली असून, अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक रियाज शेख करीत आहेत.