नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारताचा कुख्यात गुन्हेगार असलेल्या व पाकिस्तानातील कराचीत लपलेला अतिरेकी दाऊद इब्राहिमने डी-कंपनीची धुरा धाकटा भाऊ अनीस कासकरकडे सोपवली आहे. भारतीय गुप्तचर संस्थेच्या सूत्रांनी हा दावा केला आहे. ही जबाबदारी आतापर्यंत दहशतवादी व दाऊदचा सर्वात विश्वासू छोटा शकील सांभाळत होता. मात्र, दाऊद व शकील यांच्यात २ वर्षांपासून तेढ निर्माण झाल्याने कामावर परिणाम व्हायचा. म्हणून दाऊदने शकीलला बाजूला केले. अनीस कराचीतून मुंबईतील टोळीच्या साथीदारांना आदेश देत आहे.
भारत-अमेरिकेत अमली पदार्थांची तस्करी, तंबाखू व्यवसाय, नकली भारतीय चलनाचे काम अनीस हाच पाहत असल्याचा दावाही संस्थेच्या सूत्रांनी केला आहे. दाऊद, अनीस व शकील तिघेही सध्या कराचीतच आहेत. डी-कंपनीचा वारसदार बदलण्याची रूपरेषा दाऊदच्या ६०व्या वाढदिवसशीच तयार झाली. काही वर्षांपासून शकीलचे अनीससोबत पटत नव्हते. म्हणून अनीसने डी-कंपनीचा सीईओ म्हणून निर्णय घेतले. अनीसवर १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटात सहभागी असल्याचा आरोप आहे. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध इंटरपोलची रेड नोटीसही जारी झाली आहे. या स्फोटांत २५७ लोकांचा मृत्यू झाला होता.