जळगाव : प्रतिनिधी
शहरातील कोंबडी बाजार चौक परिसरात रस्त्यावरून जाणाऱ्या एका महिलेचा व्हिडीओ काढून, छेडछाड करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका तरुणाला महिलेसह नागरिकांनी जोरदार चोप दिल्याची घटना गुरुवारी दुपारी २ वाजता घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात संबंधित तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील कोंबडी बाजार भागातील खंडवा कटलरी या दुकानात आरीफ खाटीक ( वय ३१) हा तरुण कामाला आहे. गुरुवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास दुकानाच्या बाजूला असलेल्या रस्त्यावरून एक महिला आपल्या मैत्रिणीसोबत जात असताना, आरीफ याने व्हिडीओ केला असल्याचे महिलेच्या लक्षात आले. महिलेने दिलेल्या माहितीनुसार तरुणाने व्हिडीओ केल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने संबंधित तरुणाला विचारणा केली असताना, त्या तरुणाने व्हिडीओ करत नसल्याचे सांगितले. मात्र, फोन तपासला असता डिलीट केलेल्या फंक्शनमध्ये हा व्हिडीओ आढळून आला. त्यानंतर त्या तरुणाने महिलेशी अरेरावी केली. हा प्रकार परिसरातील काही नागरिकांना लक्षात आल्यानंतर नागरिकांनी संबंधित तरुणाला चांगलेच बदडले. या वादामुळे रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे थांबली होती, तसेच मोठ्या प्रमाणात गर्दीदेखील झाली. या घटनेची माहिती जिल्हापेठ पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले.