चोपडा : प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यात अनेक दिवसापासून गावठी पिस्तुलांसह अनेक गुन्हेगार दहशत माजवीत असतांना पोलीस त्यांना बेड्या ठोकत आहे. तर नुकतेच गावठी पिस्तुलांसह बसमधून प्रवास करणाऱ्या तरुणाला चोपडा पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून ३ पिस्तुले हस्तगत करण्यात आली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, उमर्टीकडून चोपडाकडे येणाऱ्या बसमधून एक संशयित युवक हा गावठी पिस्तुले घेऊन प्रवास करत असल्याची माहिती पोलिस ठाण्याला प्राप्त झाली. त्यावरून शहर पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांनी तत्काळ सहा. पोलिस निरीक्षक संतोष चव्हाण, पोउनि घनश्याम तांबे, पोहेकॉ विलेश सोनवणे, संतोष पारधी, शेषराव तोरे पोना संदीप भोई, पोकों मिलिंद सपकाळे, रवींद्र पाटील, प्रकाश मथुरे, प्रमोद पवार, आत्माराम अहिरे यांच्या पथकाला रवाना केले व सापळा रचला.
चुंचाळे गावाजवळ उमर्टीकडून चोपडाकडे येणारी बस थांबवून संशयित युवकाची ओळख पटवून त्याच्याजवळ असलेल्या बॅगची तपासणी केली असता त्यामध्ये १ लाख ३० हजार रु. किमतीची गावठी बनावटीची ३ पिस्तुले २ हजार रु. किमतीचे १ खाली मॅगझीन व १० हजार रुपये कि.ची १० जिवंत काडतुसे तसेच रोख ३ हजार ३०० रु. व ५ हजार रु. किमतीचा १ मोबाइल असा एकूण १ लाख ५० हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल आढळला. संशयिताचे नाव हनुमान गेनाराम चौधरी (२१, लोहावत, जि. जोधपूर, राजस्थान) असे असून त्याने हे पिस्तुल व राउंड हे उमर्टी, मध्य प्रदेश येथे राहणाऱ्या एका अनोळखी व्यक्तीकडून सत्रासेन येथे ताब्यात घेतल्याचे सांगितले. आरोपीविरुद्ध चोपडा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहायक पोलिस अधीक्षक ऋषिकेश रावळे आणि शहर पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अजित सावळे हे करीत आहेत.