अहमदनगर : वृत्तसंस्था
राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरु असून अनेक पर्यटक पर्यटन करण्यासाठी जात आहेत. यात अहमदनगर जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन क्षेत्र असलेले हरिश्चंद्रगड या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. हरिश्चंद्र गडावर पर्यटनासाठी आलेल्या पुणे येथील सहा पर्यटकांपैकी एकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. धुक्यामुळे रस्ता भरकटल्याने या सहा जणांनी डोंगर कपारीत मुक्काम केला होता.
मात्र थंडी तसेच पावसात काकडल्याने एकाची प्रकृती खालावली आणि त्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
अनिल उर्फ बाळू नाथाराव गिते, अनिल मोहन आंबेकर, गोविंद दत्तात्र्यय आंबेकर, तुकाराम आसाराम तिपाले, महादू जगन भुतेकर, हरिओम विठ्ठल बोरुडे हे सहा तरुण पुणे (कोहगाव) येथून १ ऑगस्ट रोजी पर्यटनासाठी अहमदनगर जिल्ह्यातील हरिश्चंद्र गडावर पर्यटनासाठी आले होते. सायंकाळी ५ वा. तोलार खिंडीतून त्यांनी गडावर चढण्यास सुरुवात केली. मात्र धुक्यामुळे ते रस्ता भरकटले. पाऊस सुरू झाल्याने या सहा जणांनी डोंगर कपारीचा आसरा घेत मुक्काम केला. पाऊस आणि थंडीत रात्रभर काकडल्याने यातील अनिल उर्फ बाळू गिते या तरुणाची प्रकृती खालावली आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. वन विभागाला माहिती समजताच गावकरी, वनविभाग आणि पोलीस प्रशासनाने मयत व्यक्तीसह पर्यटकांना गडावरून रेस्क्यू करून आणण्यात आले. तीन जणांवर रुग्णालयात उपचार सुरू असून या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान नागरिकांनी पर्यटन स्थळी जाताना खबरदारी घेण्याची गरज आहे.