जळगाव : प्रतिनिधी
जळगाव शहरातील एका परिसरातील भाजीपाला विक्रेत्या तरुणावर शुल्लक कारणाने धारदार वस्तूने वार करीत जखमी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमीवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील सम्राट कॉलनी परिसरातील लक्ष्मी नगरातील रहिवासी व भाजी पाला विक्री करून आपल्या परिवाराचे उदरनिर्वाह करणारा ३० वर्षीय तरूण शुभम पुंडलिक महाजन याला दि.२८ जुलै रोजी रात्री ललित उमाकांत दीक्षित व त्याचे साथीदार यांनी त्याच्या घराजवळ बोलाविले. किरकोळ कारणावरून त्यांच्या वाद घातला. यात एकाने मागील बाजूने उजव्या मांडीवर धारदार वस्तूने वार करून गंभीर जखमी केले व पसार झाले. ही घटना घडल्यानंतर त्याला तत्काळ कुटुंबीय व इतरांनी उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याच्यावर उपचार सुरु केले आहे. या घटनेबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. शुभम महाजन याने दिलेल्या फिर्यादीवरून शनिवारी २९ जुलै रोजी मध्यरात्री २ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे करीत आहे.