जळगाव : प्रतिनिधी
तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला परिसरातील नागरिकांनी बेदम चोप दिल्याची घटना शुक्रवार, १४ जुलै रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली.
या तरुणाला तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. संतप्त जमावाने तरुणाची दुचाकी पेटवून दिल्याने परिसरात खळबळ उडाली. काही संतप्त नागरिक त्याला पेटत्या दुचाकीवर फेकणार होते, मात्र काही पोलिस कर्मचारी व इतर नागरिकांनी त्यांना रोखले.
अनेक वर्षांपासून रहिवास याबाबत अधिक माहिती अशी की, तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत गेल्या १३ वर्षांपासून हे कुटुंब वास्तव्याला आहे. या ठिकाणी पती पत्नी, दोन मुले आणि दोन मुली राहतात. शुक्रवार, १४ जुलै रोजी १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे आई- वडील व दोन्ही भाऊ कामाच्या निमित्ताने बाहेर गेले होते. त्यावेळी या मलीसह व तिची सहा वर्षाची लहान बहिण घरीच होती. दुपारी साडे तीन वाजताच्या सुमारास चंदुअण्णा नगरातील तरुण दुचाकीने (एमएच १९ डीक्यू ७१७८) मुलीच्या घराजवळ आला. पाणी पिण्याचे निमित्त करून तो घरात गेला व मुलीला पाणी मागितले. तरुणाने तिचा हात पकडला व अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला.
नागरिकांचा संताप एवढा होता, की त्यांनी या तरुणाला कपडे फाटेपर्यंत चोप दिला. अशा प्रकारांमुळे परिसरात इतर मुला- मुलींवर विपरीत परिणाम होण्याची भीती असल्याने नागरिकांनी त्याला चांगलेच बदडून काढले. नागरिकांनी या तरुणाला चोप देऊनच सोडले नाही तर त्याला उचलून पेटत्या दुचाकीवर उचलून फेकण्याचा प्रयत्न देखील केला मात्र पोलिस कर्मचाऱ्यांनी व काही नागरिकांनी रोखल्याने पुढील अनर्थ टळला.