मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही महिनाभरापासून बंद असलेल्या शाळा उन्हाळी सुटीनंतर गुरुवारपासून सुरू होत आहेत. शिक्षण विभाग पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे जल्लोषात ट्रॅक्टर- बैलगाडीतून स्वागत करणार आहे, तर शाळेत प्रथमच पाऊल ठेवणाऱ्या बालवर्गातील बच्चे कंपनीच्या पाऊलखुणांचे जतन केले जाणार असून भिंतीवरही हातांचे ठसे उमटवणार आहेत. त्यासाठी प्राथमिक शिक्षण विभागाने जय्यत तयारी केली आहे. विद्यार्थ्यांना शाळेची ओढ लागावी व आस्था निर्माण व्हावी यासाठी पहिली-बालवाडीतील विद्यार्थ्यांचे ढोल-ताशे, लेझीम पथकांच्या गजरात स्वागत करून मिरवणूक काढण्यात येणार आहे. या प्रवेशोत्सवात पहिल्याच दिवशी पोषण आहारात गोड शिरा, बुंदीचा लाडू मुलांना देण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. यंदा नव्या शैक्षणिक सत्रातही हसत-खेळत शिक्षणावर भर दिला असून वेगळे उपक्रम राबवण्यासाठी शाळांना टार्गेट दिले आहे. अन्नामृत फाउंडेशनतर्फे मनपा शाळेतील ३५ हजार मुलांना मोफत रागी चोकोलाडू, बुंदीच्या लाडवांचे वाटप करणार आहे. या वेळी प्रशासक जी. श्रीकांत, अन्नामृतचे राजन नाडकर्णी, डॉ. रमेश लढ्ढा, सुदर्शन पोटभरे आदी उपस्थित राहणार आहेत. आज सर्व शाळा सुरू होत आहेत. बालकाला शाळेत प्रवेशित करून त्याला हसत-खेळत आनंददायी शिक्षण देणे ही शाळा, शिक्षक, पालकांची जबाबदारी आहे. शाळेची सुरुवात ही चैतन्यमय व उत्साहवर्धक झाल्यास शिक्षक व विद्यार्थ्यांना गुणात्मक वाटचालीसाठी गती मिळते. त्यासाठी शाळा प्रवेशोत्सवाचे आयोजन केले असून विद्यार्थ्यांचे गुलाबाचे फूल, मिठाई किंवा शालेय साहित्य देऊन स्वागत करावे, मध्यान्ह भोजनात गोड पदार्थाचा समावेश करावा, असे आदेश शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी दिले.