अमळनेर : प्रतिनिधी
शहरातील प्रताप महाविद्यालयाच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या केंद्रावरील बहिस्थ परीक्षकाला पाच हजारांची लाच घेताना नाशिक येथील पथकाने रंगेहाथ पकडले. शुक्रवारी दुपारी ही धडक कारवाई करण्यात आली.
प्रताप महाविद्यालयाच्या केंद्रावर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा सुरू आहेत. विद्यापीठाने विजय गुलाबराव पाटील यांची बहिस्थ परीक्षक म्हणून नेमणूक केलेली होती. परीक्षा काळात परीक्षार्थीना विनाकारण त्रास देणे, कॉपीसाठी त्यांच्याकडून पैशांची मागणी करणे असे प्रकार चालू असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले होते. यात तक्रारदार यांच्या पत्नीचे व इतर सात विद्यार्थ्यांचे बॅचलर ऑफ लायब्ररी (बी. लिब) चे पेपर सुरू होते.विजय पाटील यांनी परीक्षक म्हणून पेपर सुरळीत चालू ठेवण्यासाठी तसेच कॉपीला सहकार्य करण्यासाठी प्रत्येक विषयासाठी १०० असे नऊ विषयांसाठी एकूण ९०० रुपयांची अशी एकूण ७,२०० रुपयांची मागणी विद्यार्थ्यांकडे केली.
२ जून रोजी पेपर सुरू झाल्यावर तक्रारदार विजय पाटील यांना तडजोड अंती ठरलेल्या रकमेपैकी ५००० रुपये महाविद्यालयाच्या आवारात देत असतानाच नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक अनिल बडगुजर, पथकातील राजेंद्र गिते, संदीप बत्तीसे, संजय ठाकरे, संतोष गांगुर्डे यांनी पाटील यांना रंगेहाथ पकडले. याबाबत अमळनेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.