जळगाव : प्रतिनिधी
अमळनेर तालुक्यातील एका रस्त्यावरून घरी जाणाऱ्या तरुणाला भरदुपारी चाकू भोसकून त्याच्याकडील 2 लाखाची रोकड लुटणार्या दोन चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर तालुक्यातील ताडेपुरा येथील राजेंद्र रमेश सूर्यवंशी (वय 35) हा सद्या मेहरुण पसिरात राहत असून तो सेंट्रिंग कामाचा ठेकेदार आहे. प्लॉटच्या व्यवहाराच्या दोन लाखांची रोकड घेवून दि. 23 रोजी राजेंद्र सुर्यवंशी हा (एमएच 19, डीएच 6840) क्रमांकाच्या दुचाकीने धरणगाव मार्गे आपल्या गावाकडे जाण्यासाठी निघाला. गावाहून परत येताना तो पत्नीलाही सोबत घेऊन येणार होता. धरणगावपासून पाच किलोमीटरवर असलेल्या म्हसले गावाजवळ अचानक आलेल्या दुचाकीवरील पाच जणांनी त्याला एकटे गाठले. त्याच्या डोळ्यांत तिखट घालून त्याच्या पाठीत चाकूने तीन वार केले. तसेच त्याची एक्टिवा आणि त्याच्याजवळील दोन लाख रुपये घेऊन पसार झाले. याबाबत अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.गुन्ह्याचा तपास करीत असतांना या गुन्ह्यातील दरोडेखोर हे सुर्यवंशी याचा मित्र अविनाश तायडे याने त्याच्या चार साथीदारांच्या मदतीने केेल्याचे तपासात समोर आले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून संशयित विशाल उर्फ मास चंद्रकांत भालेराव (वय-20) रा. भालोद ता. यावल आणि अविनाश देवेंद्र तायडे (वय-24) रा. अट्रावल ता.यावल याला ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी केल्यानंतर या गुन्ह्याचा मास्टरमाईंड अविनाश तायडे हा असल्याचे समोर आले.
यांनी बजावली कामगिरी !
ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि गणेश वाघमारे, पोहेकॉ विजयसिंग पाटील, सुधाकर आंभोरे, जितेंद्र पाटील, महेश महाजन, विजय पाटील, अक्रम शेख, संदीप सावळे, लक्ष्मण पाटील, नितीन बाविस्कर, प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, नंदलाल पाटील, भगवान पाटील, प्रितम पाटील, संदीप पाटील, प्रविण मांडाळे, सचिन महाजन, ईश्वर पाटील, लोकेश माळी, भरत पाटील, महेश सोमवंशी, प्रमोद ठाकूर यांच्या पथकाने केली.