जळगाव : प्रतिनिधी
शहरातील एका परिसरातील महिला शिक्षिका फुले मार्केट परिसरात आले असता त्यांच्याकडील रोकड चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील फुले मार्केट परिसरात शनिवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास शुभांगी सुरेश बडगुजर (रा. पिंप्री खुर्द, ता. धरणगाव) या महिला शिक्षिकेने संसारात काटकसर करून आणि खासगी क्लास ने जमविलेली ७० हजार रुपयांची रोकड अज्ञात चोरट्याने फुले मार्केट परिसरातून लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी महिलेने गुरुवारी शहर पोलिसात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभांगी बडगुजर या घरामध्ये लहान मुलांची खासगी क्लास चालवितात. त्यातून त्यांनी घरखर्च भागवून ७० हजार रूपयांची बचत केली होती. शनिवारी सकाळी ११:३० वाजेच्या सुमारास त्या पतीसोबत जळगावात आल्या होत्या.
सुभाष चौक परिसरातील एका ज्वेलर्स दुकानातून जोडवे, साकळ्या नवीन केले. नंतर १ वाजेच्या सुमारास फुले मार्केट येथील एका कॉस्मेटिक दुकानामध्ये त्या सौंदर्य प्रसाधनाची साहित्य घेण्यासाठी गेल्या. पैसे देण्यासाठी त्यांनी पर्समध्ये हात टाकल्यावर त्यांना ७० हजार रुपयांची रोकड ठेवलेली लहान पर्स दिसून आली नाही. त्यामुळे त्यांना खात्री झाली की गर्दीचा फायदा घेऊन कुणीतरी त्यांच्या पर्समधून रोकड लांबविली. अखेर गुरुवारी महिलेने शहर पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.