जळगाव : प्रतिनिधी
जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अवैध वाळू वाहतुक करणार्या वाहनांवर महसूल प्रशासन कारवाई करून जप्त केलेला वाळूचा ट्रक चक्क जिल्हाधिकारी कार्यालयातून पळवून नेल्याची घटना दुपारच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात अवैध वाळूचा ट्रक जप्त करण्यात आला होता. या सर्व वाहनांवर देखरेखीसाठी पोलीस मुख्यालयातील बाळू पाटील, अविनाश जाधव, गौरख पाटील व तुषार सोनवणे यांची गार्ड म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दि.२३ रोजी मंगळवारी बाळू पाटील व अविनाश जाधव हे ड्युटीवर असतांना दुपारी सव्वा दोन वाजेच्या सुमारास त्यांना गाडी सुरु होण्याचा आवाज आला. त्यांनी त्याठिकाणी जावून पाहिले असता, महसूलच्या पथकाने कारवाई करुन जप्त केलेला (एमएच १९ ५८०८) क्रमांकाचा ट्रक दोन अनोळखी इसम घेवून गेला. घटनेची माहिती पोलिसानी महसूल पथकातील कर्मचार्याला दिली. त्यानंतर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.