जळगाव : प्रतिनिधी
सावखेडा परिसरातील गिरणा नदी पात्रात पोहताना फिट आल्याने तरुणाचा पाण्यात बुडून दुदैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी १ वाजता घडली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठा येथील राजू भूरा भिल (वय-३५) असे मयत तरुणाचे नाव आहे. राजू भिल हा तरुणा आपल्या परिवारासह पिंपळकोठा येथे वास्तव्याला होता. त्याला फिटचा आजार होता. रविवारी दुपारी १ वाजता जळगाव शहरापासून जवळ असलेल्या गिरणा नदीपात्रात पोहण्यासाठी गेला होता. नदीपात्राच्या पाण्यात पोहत असतांना त्याला अचानक फिट आले. त्यामुळे त्याला पाण्याबाहेर येता आले नाही. त्यातच त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी लिलाधर महाजन, नरेंद्र पाटील यांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृतदेह आणण्यात आला. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे