जळगाव : प्रतिनिधी
मद्यप्राशन करून घरामध्ये येण्यास मनाई केली म्हणून रावसाहेब दामू पाटील (३८, रा. न्हावी, ता. यावल) या जावयाने सासूच्या डोक्यासह कानाजवळ विळा मारून जखमी केल्याची घटना गुरुवारी कोठारीनगरमध्ये घडली. लता भास्कर पाटील (५२) असे जखमी सासूचे नाव असून याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोठारी नगरातील सासुरवाडीत गुरुवारी रावसाहेब पाटील हा आला. तेव्हा त्याला त्याच्या पत्नीने दारू पिऊन घरात येण्यास मनाई केली. याचा राग येऊन त्याने सासूच्या डोक्यासह मानेजवळ विळा मारून दुखापत केली. पत्नी वाद सोडविण्यासाठी आली असता पाटील याने पत्नीच्या मानेवर नखाने ओरबाडून शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली. अखेर सासूने रामानंदनगर पोलिस ठाणे गाठून संपूर्ण हकीकत पोलिसांना सांगितल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



