जळगाव : प्रतिनिधी
जळगाव शहरातील एका परिसरात बुधवारी रात्रीच्या सुमारास वाढदिवस साजरा करीत असताना दोन गटात तुफान राडा झाला होता. या प्रकरणी घटनास्थळी एमआयडीसी पोलीस पथक दाखल होत रात्री उशिरा कार्यवाही सुरु केली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, सम्राट कॉलनी परिसरातील मासूमवाडीमध्ये बुधवारी रात्री ९:५० वाजेच्या सुमारास एका तरुणाचा वाढदिवस साजरा सुरू होता. त्यातील काही तरुणांनी मौजमजा करताना एकमेकांच्या अंगावर फेकलेली अंडी ही काही तरुणांच्या अंगावर पडल्याने दोन समुदाय समोरासमोर येवून तणाव निर्माण झाला. एवढेच नव्हे तर एका समुदायाकडून दगडफेक सुध्दा झाली. त्यामध्ये दोन पोलिस कर्मचारी जखमी झाले. दोन मालवाहतूक रिक्षांसह दोन दुचाकींची तोडफोड सुध्दा करण्यात आली आहे. या घटनेनंतर गुरूवारी पहाटे ४ वाजेपर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली. तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले. एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख जिशांन शेख युनूस शिक्कलगर याचा बुधवारी रात्री डायमंड हॉलजवळ वाढदिवस साजरा होत होता. त्याच्या मित्रांनी एकमेकांवर अंडी फेकण्यास सुरूवात केली. नंतर एकमेकांच्या मागे पळू लागल्यामुळे अंडी इतरांच्या अंगावर पडली. या प्रकाराला काहींनी विरोध केला. त्यामुळे दोन समुदाय समोरासमोर येवून हाणामारी झाली. या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी मासूमवाडी गाठली. पोलिसांनी वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. मात्र, एका समुदायाने पोलिसांसह दुसऱ्या समुदायातील लोकांवर दगडफेक केली. यात पोलिस कर्मचारी छगन तायडे व किरण पाटील हे जखमी झाले.
एका समुदायाकडून पोलिसांसह दुसया समुदायावर दगडफेक झाल्यानंतर दोन मालवाहू रिक्षा आणि दोन दुचाकीवरसुध्दा दगडफेक झाली. यामध्ये वाहनांचे नुकसान झाले. वाद शांत होत नसल्यामुळे एमआयडीसी पोलिसांनी आणखी बंदोबस्त मागवून गोंधळ घालणाऱ्यांना पिटाळून लावले. नंतर गुरुवारी पहाटेपर्यंत संशयितांचा शोध घेवून त्यांना अटक करण्यात आली. पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. तर तीन जणांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी जिशांत शिक्कलगर याच्यासह १५ ते २० जणांविरुध्द भादंवि कलम ३५३, ३३७, ४२७, १४३, १४७, १४८, १४९ सह पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ चे पोटकलम (१) (३) व १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यांनी केली कारवाई
एमआयडीसी पोलीस स्थानकाचे पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक आनंदसिंग पाटील, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, अल्ताफ पठाण, छगन तायडे, किरण पाटील, मुकेश पाटील, विशाल कोळी, सचिन पाटील, इम्रान सैय्यद आदींनी केली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, किरण पाटील हे करीत आहेत.