जळगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील धोबीवराड गावांमध्ये बिबट्याने दहशत माजवली आहे. गाव आता दहशतीखाली येत आहे. बुधवार १७ मे रोजी रात्री शेतात बांधलेली गाय खाल्ल्यानंतर आज गुरुवार दि. १८ मे रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केला. यामध्ये शेतकरी गंभीर जख़मी झाला आहे. दरम्यान वन विभागाने दखल घेतली असून घटनेची माहिती घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार जळगाव तालुक्यातील धोबी वराड गावातील ४० वर्षीय आशीष सुधाकर सुरळकर हे या हल्यात जखमी झाले आहे. ते नेहमीप्रमाणे शेतावर जात असतांना बिबट्याने हल्ला केला. मात्र सावध होत आशिष सुरळकर याने बिबट्याला बाजूला ढकलले. पण त्या प्रयत्नात त्याच्या डाव्या बाजूला बिबट्याने पंज्याने वार केला. त्यामध्ये त्याच्या चेहऱ्यावर डाव्या बाजूला डोळ्याला, कानाला, जबर मार लागला आहे. त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला. आजूबाजूचे शेतकरी तात्काळ धावत आले. त्यांनी त्याला जळगाव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव या ठिकाणी उपचारासाठी दाखल केले. या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याच्यावर उपचार केले.
दरम्यान, रुग्णालयामध्ये वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी देखील भेट देत माहिती जाणून घेतली. ग्रामस्थांनी सांगितले की, रात्री ११ ते १२ वाजेच्या सुमारास लहू बाबुराव जाधव यांची शेतामध्ये बांधलेली पांढरी गाय देखील बिबट्याने हल्ला करून खाल्ली आहे. एक महिन्यापूर्वी देखील बिबट्याने वासरू खाल्ल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. दरम्यान या घटनेमुळे धोबी वराड गावामध्ये दहशत पसरली आहे. पोलिसांना देखील घटनेची माहिती देण्यात आलेली आहे. दरम्यान गावाच्या आजूबाजूला जंगल नाही. त्यामुळे बिबट्या नेमका आला कुठून हा प्रश्न या निमित्ताने गावकऱ्यांमध्ये चर्चेसाठी होता.