भुसावळ : प्रतिनिधी
शहरातील “नगरपालिका दवाखान्यासमोरील व्यापारी संकुलात असलेल्या न्यू गुजराती स्वीट मार्ट व मॉडर्न रोड गोपी शॉपिंग मॉल या दुकानाच्या मालकांना दोघा अज्ञातांनी अनुक्रमे १० व २० हजार अशी खंडणी मागून धमकावल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील नगरपालिका दवाखान्यासमोरील न्यू गुजराती स्वीट माचे मालक कपिल मेहता हे दुपारी १:२० मिनिटांनी दुकानाच्या काउंटरवर बसलेले असताना २० ते २५ वर्षे वयोगटातील दोन तरुण तोंडावर रुमाल बांधून काउंटरजवळ आले व मोबाइल घेऊन ‘बात कर लो’, असे म्हणून फोन हातात दिला. पलीकडून ‘राजा बात कर रहा हूँ. पाच मर्डरवाला बोल रहा हूँ. आज जो लड़के दकान पे आये उनके पास दस हजार रुपये दे’, असे हिंदी भाषेत त्याने फोनवरून सांगितले. मेहता यांनी आपण स्वतः पैसे घेऊन येतो, असे सांगितले. त्यानंतर ते दोन्ही तरुण दुकानातून निघून गेले. पुन्हा काही वेळात तरुणांनी माघारी फिरून ‘तुमको अगर कोई तकलीफ है तो मुझे बताओ. दस हजार रुपये नहीं दिये तो दुकान नहीं चलेगी और तुम भी नहीं रहेगा’, अशी धमकी देत निघून गेले याप्रकरणी कपिल मेहता यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
…तर दुसऱ्या व्यापाऱ्याकडे २० हजारांची मागणी
मॉडर्न रोडवर असलेल्या गोपी शॉपिंग मॉलचे मालक रवी गोपीचंद झमनानी हे मंगळवारी दुपारी १:४० वाजता दुकानाच्या काउंटरवर • बसलेले असताना दोघे जण रुमाल चेहऱ्याला बांधून आले व त्यांनी २० हजार रुपयांची मागणी केली. पैसे नसल्याचे सांगितल्यावर दुकानाची तोडफोड करण्याची धमकी दिली. त्यावेळेस दुकानाचा व्यवहार वडील पाहतात, असे म्हटल्यावर ४ वाजेला येऊ. पैसे तयार ठेव. नाहीतर पाहून घेऊ, अशी धमकी देऊन निघून गेले. याबाबत बाजारपेठ पोलिसांत रवी झामनानी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.