चाळीसगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस चाळीसगाव शहर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १२ मे रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास शहरातील एका अल्पवयीन मुलीस तिची आई नातेवाइकांकडे सोडून मजुरीच्या कामासाठी गेली होती. ही अल्पवयीन मुलगी रात्री ८ वाजण्यापूर्वी तिच्या मामेबहिणीसोबत घरी परत येत असताना वाटेत आकाश ऊर्फ सुपड्या विठ्ठल पाटील (वय २९) हा भेटला. मामेबहिणीला त्याने आपण या मुलीला स्कुटीवरून घरी सोडून देतो, असे सांगितले. त्यानंतर अत्याचार केला. त्यावेळी ती मुलगी रडू लागल्याने त्याने ठार मारण्याची धमकी दिली. मुलीने आई-वडिलांना घटना सांगितल्यावर त्यांनी आरोपीच्या घरी जाऊन शोध घेतल्यानंतर आरोपी पळून गेला. पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांनी स.पो.नि. विशाल टकले, सचिन कापडणीस, सागर ढिकले व कर्मचारी विनोद भोई, ज्ञानेश्वर गीते, आशुतोष सोनवणे, विनोद खैरनार, भरत गोराळकर यांचे पथक तयार करून आरोपीचा शोध सुरू केला. तो रेल्वेने पळून जाण्याच्या तयारीत होता पण, पोलिस शोधत असल्याची चाहूल लागल्याने तो एका बंद घरात लपून बसला. विनोद भोई व ज्ञानेश्वर गीते यांनी त्यास ताब्यात घेऊन पोलिस स्टेशनला हजर केले.