अमळनेर : प्रतिनिधी
शहरात भल्या पहाटे आपल्या पतीसोबत मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिलेस चाकू लावून तिची १५ ग्रॅम सोन्याची पोत कापून नेल्याची घटना १४ रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास आर. के. नगरजवळ घडली. दरम्यान चोपडा येथील घरफोडी व पोत कापून नेण्याची घटना शनिवारी चारचाकी चोरणाऱ्या टोळीनेच केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार १४ रोजी नेहमीप्रमाणे पहाटे ४ वाजता रंजनाबाई रामलाल पाटील या पती सोबत फिरायला निघाल्या होत्या. आर. के. नगरजवळ ते पोहोचले असता समोरून येणारी चंदेरी रंगांची वॅगन आर गाडी अचानक त्यांच्याजवळ थांबली. त्यातून तोंडाला रुमाल बांधलेले चारजण खाली उतरले. हा प्रकार पाहून पतीपत्नी कमालीचे घाबरले होते. त्या चौघांपैकी एकाने चाकू काढून महिलेला धाक दाखवत त्यांच्या गळ्यात असलेली सोन्याची पोत लहान हत्याराने एका सेकंदांत कापली. यामुळे महिलेच्या मानेला थोडी जखमही झाली. यानंतर ते चोरटे पटकन वाहनात बसून धुळ्याकडे पसार झाले.
या चोरट्यांकडे इतर हत्यारेदेखील असल्याने ते मोठे दरोडेखोर असावेत, अशी त्यांची खात्री झाली होती. घटनेने पतीपत्नी घाबरल्याने त्यांनी मदत मागण्याचा प्रयत्न केला. मात्र आजूबाजूला कुणीही नसल्याने ते हतबल होते. हा प्रकार सुरू असताना तेथे शेजारीच राहणारे माजी नगरसेवक राजेश पाटील यांना थोडा आवाज झाल्याने ते तेथे पोहोचले होते. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. दुसरीकडे घाबरलेले पत्नीपत्नी पळतपळत गावाकडे आले. त्यानंतर मुलाला सोबत घेत पहाटे ६ वाजताच त्यांनी पोलिस स्टेशन गाठत तक्रार दाखल केली.