चाळीसगाव : प्रतिनिधी
चाळीसगाव ते मेहुणबारे दरम्यान एका पेट्रोलपंपावर नादुरूस्त ट्रक उभा असतांना अनोळखी चोरट्यांनी ट्रकची ताडपडी फाडून पाच लाख १८ हजार ७०० रुपयांचे शेंगदाण्याचे ९१ पोते लांबविल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी ट्रक चालकाने दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांच्या विरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, धुळे शहरातील सुभाष नगरातील रहिवासी असलेले रवींद्र गन्नाथ जाधव हे ट्रक चालक असून सुमारे ५ लाख १८ हजार ७०० रूपये किंमतीचे ९१ कट्टे शेंगदाणे ट्रक (एम.एच. 18 ए.ए. 0963) मधून घेऊन जात असताना चाळीसगाव-मेहुणबारे दरम्यान ट्रक नादुरूस्त झाला. हा नादुरूस्त ट्रक नायरा पेट्रोल पंपावर उभा असतांना बुधवार, 10 मे रोजी पहाटे तीन ते दुपारी 2.30 वाजेच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने ट्रकच्या मागील बाजूने दोरी तोडून व ताडपत्री फाडून शेंगदाणे लंपास केले. या प्रकरणी ट्रक चालक रवींद्र जगन्नाथ जाधव (धुळे) यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन ला अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास हवालदार दत्तात्रय महाजन करीत आहे.