फैजपूर : प्रतिनिधी
शहरातील श्रीराम थिएटर या चित्रपटगृहावर बहुचर्चित ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट सुरू असल्याने अज्ञातांनी दगडफेक केल्याने शहरात काहीवेळ तणाव निर्माण झाले होते. ही घटना शुक्रवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने तणाव निवळला.
शहरातील श्रीराम थिएटरमध्ये दि. ९ पासून ‘द केरला स्टोरी’ या सिनेमाचे प्रदर्शन सुरू आहे. शुक्रवारी सकाळी १२ वाजेचा ‘शो’ सुरु झाल्यानंतर दुपारी दीड वाजेच्या सुमारास थेटरच्या मागील बाजूने अनोळखी ३० ते ४० जणांनी काही एक कारण नसताना थेटरवर व प्रेक्षकांच्या दिशेने दगडफेक सुरू केली. त्यामुळे सिनेमा पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांमध्ये एकच खळबळ उडाली. याठिकाणी मोठा जमाव जमला होता. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने तणाव निवळला. पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे, सिद्धेश्वर आखेगावकर यांनी शांततेचे आवाहन केले. यावेळी पोलिस ठाण्यातही मोठी गर्दी झाली होती
या घटनेप्रकरणी थिएटरचे चालक विक्की प्रकाश आठवणी यांच्या माहितीवरून पोलिसात ३० ते ४० अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, ‘द केरला स्टोरी’ सिनेमा सुरू असलेल्या श्रीराम थिएटरमध्ये पोलिस बंदोबस्तात सिनेमा सुरू झाला असल्याची माहिती प्रकाश आठवणी यांनी दिली.