चाळीसगाव : प्रतिनिधी
लोखंडवाला कॉम्प्लेक्ससमोर भडगाव रोड येथे हळदीच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या टेम्पोवरील स्पीकर बंद करण्याकरिता गेलेल्या दोघा पोलिसांना मारहाण करण्यात आली असून याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ९ मे रोजी रात्री उशिरा घडली.
चाळीसगाव पोलिस स्टेशनचे पो. कॉ. विजय अभिमन महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते ९ मे रोजी रात्री गस्त घालत असताना मध्यरात्री १२:१५ वा. पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांनी फोन करून भडगाव रोड चाळीसगाव या परिसरात स्पीकर बंद करण्याचे आदेश दिले. टाकळी प्र. चा. हद्दीतील लोखंडवाला कॉम्प्लेक्स समोर लग्नाच्या हळदीचा कार्यक्रम सुरू होता. त्याठिकाणी टेम्पोवर (एमएच ०४ / डीके ६६९७) मोठ्या आवाजात स्पीकर लावून लोक नाचत होते. त्यावेळी पो. कॉ. नरेंद्र चौधरी, पो. कॉ. विजय अभिमन महाजन हे स्पीकर बंद करण्याकरीता निघाले. त्याचवेळी नाचणाऱ्या लोकांनी गर्दी करून गोंधळ घातला. टाकळी प्र.चा.चे माजी सदस्य श्याम गवळी यांनी स्पीकर बंद केल्याच्या कारणावरून पोकों. विजय महाजन यांच्याशी हुज्जत घालून धक्काबुक्की करून मारहाण केली. तसेच अन्य दोघांनी पोलिसांना धक्काबुक्की करून शिवीगाळ केली.
पोलिसांनी मदतीकरिता पोलिस स्टेशनला ठाणे अंमलदार पो. हे. कॉ. पंकज पाटील यांना फोन करून मदत पाठवण्याबाबत कळविले. त्यानंतर काही वेळात त्यांच्या मदतीला रात्रगस्त कर्तव्यावर असलेले पो कॉ अमोल भोसले, नीलेश पाटील तसेच त्यांच्यासोबत असलेले पोहेकॉ. योगेश बेलदार असे घटनास्थळी आले. पोलिसांनी त्या तिघांचा शोध घेतला असता ते गर्दीचा फायदा घेऊन तेथून पळून गेले होते.