जळगाव : प्रतिनिधी
एरंडोल तालुक्यातील खेडी कढोली येथील ज्ञानेश्वर रमेश कोळी (३५) या शेतमजुर अमळनेर येथून घरी परतल्यानंतर बुधवारी मध्यरात्री विष प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी सकाळी ७ वाजता रहिवाशांना घरामागे कोळी यांचा मृतदेह दिसून आल्यानंतर उघडकीस आली. दरम्यान, आत्महत्येचे कारण समजून आलेले नसून या प्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
ज्ञानेश्वर कोळी हे पत्नी व दोन मुलांसह वास्तव्याला होते. शालकाच्या मुलीच्या लग्नानिमित्त कोळी हे कुटुंबीयांसह अमळनेर येथे गेले होते. बुधवारी रात्री ९ वाजता ते एकटेच खेडी-कढोली येथे परत आले. पत्नी आणि दोन्ही मुले अमळनेर येथे थांबले होते. मध्यरात्री कोळी यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. गुरुवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास शेजारच्यांना कोळी हे त्यांच्या घरामागे मृतावस्थेत दिसून आले. ही माहिती त्यांनी त्यांच्या कुटुंबीयांना सांगितली. त्यानंतर ग्रामस्थ व नागरिकांच्या मदतीने कोळी यांचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणला. आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात असून शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला होता.