जळगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील शिरसोली रस्त्यावर दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात सुसाट प्रवासी खासगी बस झाडाला आदळून अपघात झाल्याची घटना बुधवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली. या अपघातामध्ये चार प्रवाशांना दुखापत झाली असून त्यांना उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने कुठलीही जीवित हानी झालेली नाही. तर बसच्या पुढील भागाचे नुकसान झाले आहे.
बुधवारी दुपारी खासगी बस ही प्रवाशांना घेवून जळगावकडून पाचोराकडे निघाली होती. दुपारी ४ वाजेच्या सुमारास शिरसोली रस्त्यावरील हॉटेल प्रितजवळून बस जात असताना अचानक दुचाकी समोर आली. तिला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि क्षणार्धात बसही रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला जोराने आदळली. बस झाडाला आदळल्यानंतर खासगी बसच्या चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. तर बसच्या पुढील भागाचे काच फुटून ते बाहेर पडले होते. दुसरीकडे अपघातानंतर शिरसोली ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली होती. एमआयडीसी पोलिस ठाण्यातील मंदार पाटील, समाधान टहाकळे यांनी सुध्दा घटनास्थळ गाठले होते. ग्रामस्थांनी जखमींना बाहेर काढले.
या अपघातामध्ये रिना श्रीराम मोहन (१५) रा. पाचोरा, तुरबानो जमील बागवान (४४), नम्रा जमील बागवान (२०) आणि ओंकार तुकाराम पाटील (६५, सर्व रा. पाचोरा) हे प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. शिरसोली ग्रामस्थांसह पोलिसांनी जखमींना रुग्णवाहिकेतून तत्काळ उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविले. दरम्यान, अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली होती.