जळगाव तालुक्यातील एका गावातील दोन भाऊ गावापासून काही अंतरावर रानात सरपण गोळा करण्यासाठी गेले असल्याने एका २५ वर्षीय तरुणावर दबा धरुन बसलेल्या बिबट्याने हल्ला चढविल्याची घटना रविवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास जळगाव तालुक्यातील मन्यारखेडा परिसरात घडली. यावेळी जखमीच्या भावाने त्याठिकाणी धाव घेत जखमी भावाला तात्काळ शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले. या हल्ल्यात मदन सुखदेव अहिरे (वय- २५) हा तरूण जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहे.
जळगाव तालुक्यातील मन्यारखेडा गावात मदन अहिरे हा तरुण वास्तव्यास आहे. त्याचा मोठा भाऊ राजेंद्र सुकदेव अहिरे (वय २८) हा त्याला गावापासून 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या रानात सकाळी 11 वाजता सरपण गोळा करायला घेवून गेला होता. रानात सरपण गोळा करीत असतांना जंगलात राजेंद्र हा थोडा पुढे होता. तर मदन मागे राहून लाकडे गोळा करीत होता. त्यावेळी अचानक झाडीत दबा धरून बसलेल्या बिबट्याने मदनवर हल्ला केला. मात्र हल्ल्याची चाहूल लागताच मदनने बिबट्याला पूर्ण ताकद लावून बाजूला फेकले. तरुण व बिबट्याची झालेल्या झटापटीत बिबट्याने मदनच्या गळ्यावर व उजव्या कानाला बिबट्याने पंजे मारुन गंभीर जखमी केले. बिबट्याच्या हल्ल्यात रक्तबंबाळ झाल्यावरही मदनने हिम्मत ठेऊन आरडाओरडा करून भावाला आवाज दिला. त्यामुळे बिबट्या जंगलात पळून गेला. भाऊ राजेंद्रने धाव घेत जखमी भाऊ मदनला उचलत नागरिकांच्या मदतीने त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून तरुणावर उपचार सुरु आहे.