जळगाव : प्रतिनिधी
साडी-चोळी नेसून साजशृंगार करत तृतीयपंथीयांसारखे हातवारे करून नागरिकांच्या घरात शिरून जबरीने पैशांची मागणी करणाऱ्या तोतया तृतीयपंथीयांची खऱ्या तृतीयपंथीयांनी विवस्त्र करून धुलाई केल्याची घटना शनिवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास सागर पार्क परिसरामध्ये घडली. यावेळी नागरिकांची प्रचंड गर्दी या परिसरामध्ये गोळा झाला होती. धुलाई केल्यानंतर तोतयाला सोडून देण्यात आले.
शहरातील सागर पार्क परिसरामध्ये तीन तोतया तृतीयपंथीयांच्या वेशभूषेत नागरिकांच्या घरात शिरून पैशाची मागणी करीत होते. त्यांचा सातत्याने त्रास होत असल्याने तेथील नागरिकांनी खऱ्या तृतीयपंथीयांना याची माहिती दिली. काही वेळात खऱ्या तृतीयपंथीयांनी सागर पार्क परिसर गाठले. त्यांनी तिघा तोतयांना पकडण्याचा प्रयत्न केला असता, दोन जण पसार झाले, तर एक त्यांच्या हाती लागला. त्यांनी त्याला विवस्त्र करून चांगलीच धुलाई केली.