जळगाव : प्रतिनिधी
शहरातील दीक्षितवाडी परिसरातील पीयूष नरेंद्र पाटील यांच्यासह त्यांच्या आईला गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात स्वतःच्या काकांसह ९ जणांनी मारहाण करून १२ लाख ४० हजार रूपये किमतीचे सोन्याचे दागिने हिसकावल्याची घटना घडली होती. याप्रकरणी पीयूष पाटील यांच्या फिर्यादीवरून बुधवारी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून अॅड. विजय पाटील यांच्यासह पीयूषच्या तिन्ही काकांना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दीक्षित वाडी परिसरतील माजी नगरसेवक स्व. नरेंद्र भास्करराव पाटील यांचे घर आहे. पहिल्या माळ्यावर मुलगा पीयूष नरेंद्र पाटील हा आई ज्योती यांच्यासह राहतो. तर तळ मजल्यावर काका विजय भास्कर पाटील, संजय भास्कर पाटील, मनोज भास्कर पाटील राहतात. नरेंद्र पाटील यांचे जळगाव पीपल्स बँकेत वैयक्तिक लॉकर होते. त्यांचे निधन झाल्यानंतर बरेच वर्ष लॉकर न वापरण्यात आल्याने त्याबाबत बँकेने नोटीस प्रसिद्ध केली होती. नोटीस वाचल्यानंतर पीयूष पाटील यांनी आई ज्योती, बहीण मयूरी आणि स्वतःच्या नावाची कायदेशीर वारस म्हणून नोंद केली. नंतर ११ ऑक्टोबर २०२२ रोजी संजय पाटील यांनी पीयूषला सांगितले की, लॉकर उघडण्याची परवानगी मिळालेली आहे. दोघे दुचाकीने बँकेत गेले. काकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून पीयूष याने सर्व दागिने काढून दोघे दचाकीने घरी आले.
घरात काका विजय भास्कर पाटील, मनोज भास्कर पाटील, सुहास वसंत चौधरी, यश सुहास चौधरी, सारंग सुहास चौधरी, नरेंद्र गुलाबराव गांगुर्डे, रागिणी सुहास चौधरी, शैलेजा नरेंद्र गांगुर्डे घरात हजर होते. चहा घेतल्यावर पीयूष पाटील दागिने बँकेत ठेवून येतो असे त्यांना सांगून निघत असताना काका विजय भास्कर पाटील याने बॅग जबरदस्तीने हिसकावली व धक्काबुक्की करीत शिवीगाळ केली मारहाण केली. तसेच त्याच्या आईला शिवीगाळ केली, असे फिर्यादीत नमूद आहे. दरम्यानच्या काळात दागिने परत करण्यासाठी त्यांनी वारंवार विनंती केली मात्र धमकी देत हाकलून दिले होते. अखेर बुधवारी फिर्याद दिली. तिन्ही काकांना अटक करून न्यायालयात हजर केले असता, २९ पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. सरकार पक्षातर्फे अॅड. रंजना पाटील यांनी कामकाज पाहिले. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक शांताराम देशमुख हे करीत आहेत.