जळगाव : प्रतिनिधी
क्रिप्टो करन्सीत गुंतवणूक केल्यानंतर त्यातून जादा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत जळगावातील तरुणाला तब्बल १५ लाख ३५ हजारांचा गंडा घालण्यात आला. या प्रकरणी मंगळवारी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात शुभम सावंत व जॅस्मीन नाव सांगणार्या संशयीतांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील देविदास कॉलनीत पवन बळीराम सोनवणे (२५) हा तरुण वास्तव्यास आहेत. 12 ते 22 एप्रिल 2023 दरम्यान पवन यास व्हॉटसअॅप 9626727480 वरून कॉल केलेल्या संशयीताने शुभम सावंत तर 009 +639366469803 क्रमांकावरून कॉल करणार्या संशयीताने जॅस्मीन नाव सांगून सोशल मिडीया तसेच टेलिग्रामवरून वारंवार संपर्क साधला. क्रिप्टो करन्सीत गुंतवणूक केल्यास जादा परतावा मिळेल, अशी भूरळ तरुणाला घालण्यात आली व संशयीतांच्या बोलवण्यावरून विश्वास ठेवत तरुणाकडून वेळोवेळी तब्बल 15 लाख 35 हजार रुपये संशयीतांनी ऑनलाईन स्वीकारले मात्र त्या मोबदल्यात कोणतीही रक्कम पवन यास परत करण्यात आली नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर पवन सोनवणे याने याबाबत मंगळवारी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावरून अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक उतेकर करीत आहेत.