नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशभर अनेक रस्त्यावर रोडरोमिओ दिसत असतात पण त्यावर कुठलाही अंकुश न बसत असल्याने एका मुलीने या मुलांना अद्दल घडविण्यासाठी एक सापळा रचला व ते मुल त्या सापळ्यात सापडले देखील हि घटना मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेरमध्ये एका तरुणीने त्रास देणाऱ्या रोडरोमिओला भेटायला बोलावले आणि चांगलीच अद्दल घडवली.
माहितीनुसार, विद्यापीठ पोलिस स्टेशन परिसरातील रहिवासी तरुणी आणि तिच्या बहिणीला टवाळखोर तरुण फोन आणि मेसेज करून सतत त्रास देत होता. दोघींनी त्याला समजावण्याचा अनेकदा प्रयत्न केला, पण काही उपयोग झाला नाही.
अखेर त्याला धडा शिकवण्याचे दोघींनी ठरवले. तू ऐकायला तयार नाही तर भेटते, असे म्हणत एका तरुणीने त्याला आकाशवाणी समोरील झलकारी बाई पार्कमध्ये बोलावले. तो पार्कमध्ये आल्यावर त्याला बसवले आणि नंतर थेट पायातून चप्पल काढून ‘प्रसाद’ देण्यास सुरुवात केली. आवाज ऐकून लोकांची गर्दी जमा झाली. लोकांना कारण कळाल्यावर त्यांनीही धुलाई केली. अखेर तरुण हात जोडून माफी मागू लागला. तोपर्यंत पोलिस आले आणि त्याला चौकीत घेऊन गेले. गर्दीतून कोणीतरी व्हिडीओ टिपला आणि तो आता व्हायरल होत आहे.